पोटाची खळगी भरायला महाराष्ट्रात आला; मारहाणीत संदीपचा करुण अंत, पत्नी-दोन लेकरं पोरकी

सोलापूर : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या एका मजुराचा मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात घडली आहे. संदीप कुमार (वय ३०) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. संदीप हा प्रयागराज येथील एका छोट्या गावातून रस्त्याच्या कामासाठी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे आला होता. पत्नी आणि दोन लहान मुलांच्या भविष्यासाठी दोन पैसे अधिक मिळावेत, या आशेने तो महाराष्ट्रात काम करत होता. १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास रस्त्याचे काम सुरू असताना संदीपचा सागर आणि दयानंद नावाच्या दोन कामगारांसोबत काही कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संदीपला गंभीर मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

स्थानिक नागरिकांनी तातडीने संदीपला अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात संदीपवर उपचार सुरू होते. तब्बल सात दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र अखेर ८ ऑगस्ट २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संदीपच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात आलेल्या संदीपचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मारहाणीचे नेमके कारण, घटनेतील आरोपींची भूमिका आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.