शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंड; माँ शितलादेवीच्या आषाढ महायात्रेने सोलापूर भक्तीमय
सोलापूरमध्ये लोधी समाजाची शेकडो वर्षांची परंपरा असलेली माँ
शितलादेवी आषाढ महायात्रा रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार
पडली. पहाटेपासूनच माँ शितलादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लष्कर
परिसरातील नळबाजार चौक तसेच हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका येथील मंदिरांमध्ये भाविकांनी
पूजा-अर्चा करून देवीला नैवेद्य आणि प्रसाद अर्पण केला. सोलापूरसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कर्नाटकातील विजापूर
परिसरातूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले.
शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार समाजबांधव, माता-भगिनी आणि लहान मुलांनी नवीन वस्त्रे परिधान करून नैवेद्य-प्रसादासह
सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि माँ शितलादेवीच्या जयघोषात रंगभवन, पत्रकारनगर येथील वनशितलादेवीच्या महापूजेसाठी हजारो भाविक एकत्र आले.
सामूहिक महापूजा, दर्शन आणि प्रसाद वितरणामुळे संपूर्ण परिसर
भक्तिमय झाला. लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, समाजातील
पंच, कुटुंबप्रमुख आणि ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली या
महायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीने
सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, महापौर
अविनाश कोंड्याल, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत,
माजी आमदार दिलीप माने, प्रकाश यलगुलवार,
शिवशरण पाटील यांच्यासह लोधी समाजातील पदाधिकारी आणि समाजबांधव
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी लोधी समाजाच्या
विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले. लोधी भवन उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी,
तर वनशितलादेवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तसेच बालाजी मंदिर
परिसराच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार
असल्याचे त्यांनी सांगितले. माँ शितलादेवीच्या आषाढ महायात्रेच्या निमित्ताने
धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि
समाजातील परस्पर स्नेह अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.