गडचिरोलीत आश्रमशाळेत सर्पदंशाचा कहर; तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तिघींची प्रकृती गंभीर

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच गडचिरोली जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विषारी सर्पदंशामुळे तीन चिमुरड्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनी झोपेत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.

मृत विद्यार्थिनींची नावे:

  • सुश्मिता सरोजित मंडल – वय १४ वर्षे
  • दीपिका एतवा लकडा – वय १२ वर्षे
  • अनु गजुराम कोरेटी – वय ८ वर्षे

तर दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती आहे.

खाटा नसल्याने विद्यार्थिनी जमिनीवर झोपत होत्या?

या घटनेनंतर आश्रमशाळेतील सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनींना झोपण्यासाठी खाटा उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, घटनेच्या वेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षक गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी आणि आश्रमशाळेतील व्यवस्थापनाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

आझाद समाज पार्टीचा प्रशासनावर निशाणा

घटनेनंतर आझाद समाज पार्टीने प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी आश्रमशाळांमधील सुविधांच्या अभावावर प्रश्न उपस्थित करत संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्था, सर्पदंशाची नेमकी परिस्थिती आणि प्रशासनाकडून झालेला संभाव्य हलगर्जीपणा याची चौकशी होण्याची शक्यता आहे.