जालन्यात धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त; २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपरसह ४१ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात

जालना शहरात धारदार शस्त्रांचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चंदनझिरा पोलिसांनी सुंदरनगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत तब्बल ४१ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा शस्त्रसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे १ लाख ३४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात शेख माजेद या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना सुंदरनगर परिसरात मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे आणण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा शस्त्रसाठा जप्त केला. प्राथमिक तपासात ही शस्त्रे जालना, भोकरदन आणि परतूर शहरातील विविध भागांमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या शस्त्रांची मागणी राजस्थानमधील अजमेर येथून करण्यात आल्याची प्राथमिक माहितीही तपासात समोर आली आहे.

या शस्त्रांची खरेदी, वाहतूक आणि विक्रीच्या संपूर्ण साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे जालना शहरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी संशयितांचा सहभाग आहे का, तसेच जप्त केलेली शस्त्रे कोणाला विकली जाणार होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या शस्त्रसाठ्यामागील संपूर्ण नेटवर्क आणि उद्देश स्पष्ट होण्याची शक्यता आहे.