स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही वाटप
सोलापूर : स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८९व्या
जयंतीनिमित्त मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा, कॅम्प, सोलापूर
येथे विद्यार्थ्यांसाठी वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. डॉ.
सूर्यप्रकाश राजेश कोठे, एम.बी.बी.एस., एम.डी., डी.एम. (गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी), कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट व जी.आय. एन्डोस्कोपिस्ट यांच्या वतीने
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप करण्यात आले. स्व. विष्णुपंत तात्यासाहेब
कोठे यांच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा
हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन
देतानाच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सूर्यप्रकाश
कोठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “या वह्यांमध्ये तुमचे स्वप्न, तुमचे भविष्य आणि तुमचे अपयश लिहून काढा. त्यातून तुम्ही नक्कीच पुढे मोठे
व्हाल,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी
विद्यार्थ्यांना दिला. स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनीही खडतर प्रवास करून
दोन शाळांची उभारणी केली, त्यांच्या कार्यातून
विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही डॉ. कोठे यांनी
सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून
दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या शिक्षकांच्या वतीने डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने
उपस्थित होता.