स्मार्ट मीटरविरोधात हजारो कामगार रस्त्यावर; पोलिसांशी झटापट, सुमारे ४०० आंदोलक ताब्यात
सोलापूर, दि. १० ऑगस्ट : स्मार्ट मीटरचा
निर्णय रद्द करावा, चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, कामगार
कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, विडी कामगारांना
कायदेशीर किमान वेतन व रोख मजुरी द्यावी, वाढती महागाई आणि
बेरोजगारी रोखावी, तसेच पेट्रोल, डिझेल
आणि गॅसच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, या मागण्यांसाठी
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात सिटूच्या वतीने सोमवारी सोलापुरात जोरदार
‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.
हजारो कामगारांनी हातात लाल झेंडे घेत शांती चौक परिसरात मोठी गर्दी
केली. आंदोलकांनी रस्ता रोखून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही
काळ शांती चौक परिसरात मोठी गर्दी आणि वाहतुकीवर परिणाम झाला. सिटूचे राज्य
उपाध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम
(मास्तर), राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख आणि कॉ. नलिनीताई
कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना कॉ. नरसय्या
आडम यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले,
तर जनतेचा आक्रोश आणखी तीव्रतेने रस्त्यावर दिसेल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
आंदोलकांनी शांती चौकात ठिय्या देत ‘जेल भरो’ आंदोलन सुरू केल्यानंतर
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी
घोषणाबाजी सुरू ठेवत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी सुमारे ४०० आंदोलकांना
ताब्यात घेऊन जेल रोड पोलिस ठाण्यात हलविले.
दरम्यान, दत्तनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही
कार्यकर्त्यांनी शांती चौकाकडे धडक दिल्याचे सांगण्यात आले. तसेच कुंभारी
परिसरातही सिटूच्या वतीने जोरदार ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ॲड.
कॉ. अनिल वासम, कॉ. दत्ता चव्हाण, कॉ.
नसीमा शेख, कॉ. शेवंता ताई देशमुख, व्यंकटेश
कोंगारी, सुनंदा बल्ला, वीरेंद्र,
पद्मा, दाऊद शेख, नरेश
दुगाणे, हनीफ सातखेड, किशोर मेहता,
मलेशम कारमपुरी, पांडुरंग म्हेत्रे, दीपक निकंबे, अभिजीत निकंबे, विजय
हरसुरे यांच्यासह विविध भागांतील कार्यकर्ते सहभागी झाले.
स्मार्ट मीटरचा निर्णय, कामगार कायदे, महागाई, बेरोजगारी, इंधन दर आणि आरोग्य-शिक्षणावरील खर्च या
प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी
सिटूच्या वतीने करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी व्यापक आणि
तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.