पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कार दुभाजकावर आदळून ट्रकला धडकली, चार तरुणांचा मृत्यू

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. महाबळेश्वरच्या दिशेने पर्यटनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर कार तीन ते चार वेळा पलटी होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालट्रकला धडकली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तळेगाव दाभाडे येथील वेदांत अर्जुन वारिंगे, कामशेत येथील सोनलिंग धीरेंद्र ठाकुर, टाकवे येथील आदित्य बाळासाहेब गरुड आणि कामशेत येथील निखील बाळू राऊत यांचा समावेश आहे. सर्व मृत तरुणांचे वय १९ ते २० वर्षांच्या दरम्यान आहे.

या अपघातात दीक्षित दयानंद पुजारी आणि कारचालक मयुर हनुमंत शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. कारचा चक्काचूर झाल्याने मृतदेह वाहनात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला तीन तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले. या प्रकरणी मालट्रकचालक शिवकुमार देवांगत यांच्या फिर्यादीवरून कारचालक मयुर हनुमंत शिंदे याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघातामुळे तळेगाव दाभाडे, कामशेत आणि मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.