कूकरच्या झाकणाने डोकं फोडलं, बाथटबमध्ये बुडवलं; पत्नीच्या हत्येनंतर नवऱ्याने रचला बनाव

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात पत्नीच्या निर्घृण हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. नासिरपीर परिसरातील भाड्याच्या घरात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी पती दिलीप कुमार यादव याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप यादव याला पत्नी शालिनीच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोप त्याने केला होता. याच संशयातून ८ ऑगस्ट रोजी त्याने आपल्या दोन भावांच्या मदतीने पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपीने कूकरचे झाकण आणि हँडलने शालिनीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर तिची मान पकडून तिला बाथटबमध्ये बुडवून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

हत्या केल्यानंतर आरोपी काही काळ घराबाहेर फिरत राहिला. त्यानंतर परत येऊन त्याने आपल्या भावांना फोन केला आणि पत्नी बेशुद्ध असल्याचा बनाव केला. त्यानंतर शालिनीला रुग्णालयात नेण्यात आले. कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपीने रुग्णालयात रडण्याचे नाटक केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. शालिनी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. दिलीप आणि शालिनी यांनी ३ डिसेंबर २०१७ रोजी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघे शादीपूर आणि नासिरपीर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. कालांतराने त्यांच्यात वाद वाढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ९ ऑगस्ट रोजी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दिलीप यादवला अटक केली. दरम्यान, आरोपीने पत्नीच्या अनैतिक संबंधांचा आरोप केला असला तरी शालिनीच्या वडिलांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यामुळे हत्येमागील नेमका उद्देश आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.