धावत्या एसटीचे चाक निखळले अन् १०० फूट दूर जाऊन पडले; चालकाच्या प्रसंगावधानाने २८ प्रवाशांचा जीव वाचला!
गडचिरोली जिल्ह्यात एसटी बसच्या सुरक्षेबाबत गंभीर घटना समोर आली आहे. अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळले. हे चाक बसपासून तब्बल १०० फूट दूर जाऊन पडले. घटनेच्या वेळी बसमध्ये २८ प्रवासी होते. चाक निखळल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बसवरील नियंत्रण कायम ठेवले आणि बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला.
नेमकी घटना कशी घडली?
बुधवारी अहेरी आगाराची एसटी बस प्रवाशांना घेऊन
सिरोंच्याच्या दिशेने जात होती. मेळाराम गावाजवळ बस पोहोचली असता अचानक मोठा आवाज
झाला. त्यानंतर बसचे मागील चाक निखळून वेगाने दूर जाऊन पडले. चालकाच्या लक्षात ही
बाब येताच त्याने तातडीने बस नियंत्रित केली. विशेष म्हणजे, मागील बाजूचे दुसरे चाकही बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्याचे सांगण्यात
येत आहे. त्यामुळे चालकाने वेळीच बस थांबवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
प्री-ट्रिप तपासणीवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर एसटी आगाराच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्न
उपस्थित होत आहेत. बस रवाना होण्यापूर्वी प्री-ट्रिप तपासणीमध्ये नट-बोल्ट आणि
इतर तांत्रिक बाबी तपासल्या जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, सर्व तांत्रिक बाबी तपासल्या असतील तर धावत्या बसचे चाक अचानक कसे निखळले,
असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून चाक निखळण्यामागचे नेमके तांत्रिक
कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाणार आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे २८ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.