घर पाहायला गेलेल्या पती-पत्नीवर पिटबुलचा थरकाप उडवणारा हल्ला; गंभीर जखमी, CCTV व्हिडीओ व्हायरल
पंजाबमधील पटियाला येथे घर पाहण्यासाठी गेलेल्या
पती-पत्नीवर पिटबुल कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घराचा गेट उघडताच कुत्र्याने दोघांवर झडप घातली. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकित सभरवाल आणि शिफाली
सभरवाल हे दाम्पत्य घुमन नगर परिसरात भाड्याने घर पाहण्यासाठी गेले होते.
त्यांच्यासोबत ब्रोकरही होता. घर पाहत असतानाच गेट उघडण्यात आले आणि अचानक पिटबुल
कुत्रा बाहेर आला. काही क्षणांतच त्याने शिफाली यांच्यावर हल्ला केला.
कुत्र्याने त्यांच्या हात-पायांसह पाठ, पोट आणि खांद्यावर गंभीर जखमा केल्या. पत्नीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या
अंकित यांच्यावरही कुत्र्याने हल्ला केला. हा हल्ला तब्बल पाच ते सात मिनिटे सुरू
होता. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अंकित यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी
टाके घालण्यात आले असून, शिफाली यांच्या हातावर आणि पायांवर
शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.
अंकित यांनी पोलिसांकडे तक्रार करत आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. कुत्र्याचा मालक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत
असतानाही तो ऐकत नव्हता, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान,
घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली आहे.
डीएसपी जंगजीत रंधावा यांनी व्हिडीओची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. शिफाली
यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकाविरोधात कायदेशीर
कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या
घटनेमुळे पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या
सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.