‘कंपन्या बंद झाल्याचा आभास’; ७६% कंपन्या प्रत्यक्षात कधी सुरूच झाल्या नाहीत, CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर

महाराष्ट्रातील कंपन्या बंद होण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिल्यानंतर या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. खासदार शरद पवार यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी शेअर करत या दाव्याला उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातून उद्योग आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर बंद झाल्याचा केवळ आभास निर्माण केला जात आहे. बंद झालेल्या कंपन्यांपैकी तब्बल ७६ टक्के कंपन्या ‘डिफंक्ट’ आहेत. म्हणजेच या कंपन्या केवळ कागदावर नोंदणीकृत झाल्या होत्या आणि प्रत्यक्षात कधी सुरूच झाल्या नव्हत्या.

याशिवाय सुमारे १२ टक्के कंपन्यांचे इतर कंपन्यांमध्ये विलीनीकरण झाले, तर केवळ २ टक्के कंपन्या विसर्जित झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. २०१९-२० मध्ये केंद्र सरकारने निष्क्रिय कंपन्यांविरोधात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा लाख कंपन्या ‘स्ट्राइक ऑफ’ केल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधांच्या समस्यांवरही सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे. संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. चाकणमधून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.