महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; शाळांपासून ५०० मीटर परिसरात 'Sting' एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही शाळेपासून ५०० मीटर अंतरावरील दुकानांमध्ये 'Sting' एनर्जी ड्रिंकची विक्री बंद करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच आमदार राहुल कुल आणि वरुण सरदेसाई यांनीही या विषयावर उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या
आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांची विक्री रोखण्यासाठी संबंधित
यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पालक, शिक्षक,
मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषदांनी अशा प्रकारची विक्री आढळल्यास
अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात
आले आहे.
सरकारने राज्यातील अन्न तपासणी व्यवस्था अधिक सक्षम
करण्यासाठीही पावले उचलली आहेत. सध्या मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर येथे कार्यरत
प्रयोगशाळांव्यतिरिक्त रायगड, नाशिक, पुणे
आणि यवतमाळ येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक-खासगी
भागीदारी (PPP) तत्त्वावर आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्याची
घोषणाही करण्यात आली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते मे २०२६ या कालावधीत Sting एनर्जी
ड्रिंकचे २७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी १०
नमुने प्रमाणित आढळले. तसेच विविध एनर्जी ड्रिंकचे ११५ नमुने तपासण्यात
आले असून त्यापैकी ६३ नमुने प्रमाणित, एक नमुना
कमी दर्जाचा, तर सहा नमुने मिथ्याछाप आढळले आहेत.
उर्वरित नमुन्यांची तपासणी सुरू आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही आणि शाळांच्या परिसरात
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.