धावत्या बसमधून गुटखा थुंकताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; टिपरच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा जागीच अंत

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कुंडगोल येथे बुधवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. धावत्या बसमधून गुटखा थुंकण्यासाठी खिडकीबाहेर डोके काढलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिपरची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार, मृत विद्यार्थी शिक्षणासाठी हुबळी येथे राहत होता. तो बसने प्रवास करत असताना गुटखा थुंकण्यासाठी खिडकीबाहेर वाकला. त्याचवेळी मागून येणाऱ्या टिपरने त्याला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसमधील प्रवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे धावत्या वाहनातून बाहेर वाकणे किंवा खिडकीबाहेर डोके अथवा हात काढणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.