स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये अन्न व औषध विभागाची कारवाई; भेसळखोरांना ₹16 हजारांचा दंड

अक्कलकोट:- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेअंतर्गत श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसरातील मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि इतर अन्न व्यावसायिकांची सखोल तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अक्कलकोट मधील एकूण ३० अन्न व्यावसायिकांची तपासणी केली. त्यापैकी १३ व्यावसायिकांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम ६९ अंतर्गत तडजोड प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ₹16 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन मिठाई दुकानांना सुधारणा नोटीसही बजावण्यात आली.

तपासणीदरम्यान पेढा आणि बर्फीचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नमुन्यांच्या तपासणीनंतर आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सहाय्यक आयुक्तांनी सांगितले की, अक्कलकोटमध्ये भविष्यातही गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल्स, कॅन्टीन, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्य व्यवसायांची विशेष तपासणी सुरू राहणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी कारवायांना वेग आला आहे. सोलापूर जिल्ह्यातही गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली असून, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरही विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.