मनपा आरोग्य, अंगणवाडी व रुग्णवाहिका प्रश्नांवर विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे आक्रमक; मंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन

सोलापूर शहरातील आरोग्य आणि महिला-बालविकास विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी विधानसभेत आवाज उठवला. मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिकांचा ग्रेड पे आणि अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसंदर्भातील मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले.

विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने सोलापूर महानगरपालिका रुग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावित होत असल्याचे आमदार कोठे यांनी निदर्शनास आणून दिले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे नुकतेच आरोग्य अधिकाऱ्यांनाच प्रसूती करावी लागल्याची घटना सांगत त्यांनी मानधनवाढीचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी केली. सोलापूर शहरात विविध तीर्थक्षेत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते. शासकीय राजशिष्टाचारासाठी रुग्णवाहिका वापरली गेल्यास आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जिल्ह्यासाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय, मनपा आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या ,३०० रुपयांच्या ग्रेड पेचा प्रस्ताव मंजूर असूनही प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.

अंगणवाडी मदतनीस पदावरून सेविका झालेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका पदाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही आमदार कोठे यांनी सभागृहात केली. सध्या थेट भरती झालेल्या सेविकांना ही संधी उपलब्ध असली तरी पदोन्नतीने आलेल्या सेविकांना ती मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रश्नांवर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीबाबत तसेच नवीन अंगणवाडी केंद्रांच्या वाढीसंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. तर आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनीही सोलापूरमधील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात वेळ संपल्यानंतरही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी तालिका सभापती समाधान आवताडे यांचे आभार मानले.