"सिया दोषी ठरली तर तिलाही लोहगडावरून खाली ढकलून द्या"; भावाच्या चौकशीनंतर आईची संतप्त प्रतिक्रिया

पुणे :- पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांनी जवळपास १० तास चौकशी केली. या चौकशीनंतर सियाची आई पूजा गोयल यांनी माध्यमांसमोर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

पूजा गोयल यांनी सांगितले की, सिया दोषी आढळली तर तिला फाशीची शिक्षा द्यावी किंवा ज्या लोहगड किल्ल्यावरून केतनला ढकलण्यात आले, त्याच किल्ल्यावरून तिलाही खाली ढकलून द्यावे. दोषी कोणताही असो, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, सियाची लोहगडावर जाण्याची इच्छा नव्हती. घटनेपूर्वी केतनने सियाला व्हिडिओ कॉल केला होता. त्या वेळी केतनची आईही कॉलमध्ये सहभागी होती. सियाने स्वतःला लोहगडावर जायचे नसल्याचे सांगितले होते. मात्र, केतनच्या आग्रहामुळे आपण तिला जाण्यास सांगितल्याचा दावा पूजा गोयल यांनी केला.

या संदर्भातील चॅट रेकॉर्ड उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही कुटुंबे या विवाहाबाबत समाधानी होती आणि कोणताही गंभीर वाद असल्याची माहिती त्यांना कधीच मिळाली नव्हती. जर केतन आणि सिया यांच्यात काही मतभेद होते, तर त्याची कल्पना दोन्ही कुटुंबांना दिली जायला हवी होती, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून विविध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तपासाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केली असून हा खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.