टेम्पोच्या भीषण धडकेत पुण्यातील तरुण अभियंत्याचा मृत्यू; अक्कलकोटकडे जाताना काळाचा घाला

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ते श्री सिद्धेश्वर साखर कारखाना मार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. विटांनी भरलेल्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पुण्यातील तरुण अभियंता वरुण यशवंत खंडागळे (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण खंडागळे हे मूळचे सोलापूर शहरातील आदित्यनगर परिसरातील रहिवासी होते. ते सध्या पुण्यातील हडपसर येथील ज्ञानेश्वर कॉलनीत राहत असून एका खासगी कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते.

कंपनीच्या कामानिमित्त ते शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून अक्कलकोटकडे निघाले होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कुंभारी ते श्री सिद्धेश्वर साखर कारखाना मार्गावरील चाबुकस्वार वस्तीसमोर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या विटांनी भरलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच वरुण यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. नातेवाईकांचा आक्रोश पाहून परिसरात शोककळा पसरली होती. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.