सोलापूर मनपाकडून ४३१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण; शिक्षणाला चालना देणारा उपक्रम

सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती विभागाच्या वतीने मनपा संचलित माध्यमिक शाळांमधील इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, २४ जून २०२६ रोजी महानगरपालिका मराठी मुलींची शाळा, कॅम्प, दक्षिण सदर बाजार, टक्कर येथे पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणास प्रोत्साहन देणे, मनपा शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत मनपा प्रशाला क्रमांक १, , ३ व ४, मनपा उर्दू कॅम्प शाळा, जय भवानी प्रशाला तसेच सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी सोनाली यादव यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत यशस्वी भविष्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाचे आवाहन केले.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत मनपा शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक आसाद (सर) नरसिंग रामपुरे यांनी शाळांच्या दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. यावर्षी मनपा माध्यमिक प्रशालांच्या मागणीनुसार इयत्ता ९ वीच्या २०४ आणि इयत्ता १० वीच्या २२७ अशा एकूण ४३१ विद्यार्थ्यांना सुमारे ३,९९१ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या पुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र, रिटेल, ऑटोमोबाईल आणि उर्दू विषयांचा समावेश होता.

कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, एमआयएमच्या गटनेत्या वहीदाबानो शेख, नगरसेवक आसाद रामपुरे, श्वेता खरात (खांडेकर), कल्पना कदम, प्रियदर्शन साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी व मुख्यलेखापाल रत्नराज जवळगेकर, प्रशासन अधिकारी मल्हारी माने, महिला व बाल कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, मुख्याध्यापिका हंचाटे मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व सांगत शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.

महत्त्वाचे मुद्दे:
👉 ४३१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
👉 एकूण ३,९९१ शालेय पुस्तके वाटप
👉 इयत्ता ९ वीचे २०४ व इयत्ता १० वीचे २२७ विद्यार्थी लाभार्थी
👉 महिला व बाल कल्याण समिती विभागाचा पुढाकार
👉 गुणवत्तापूर्ण शिक्षण व पटसंख्या वाढीसाठी महत्त्वाचा उपक्रम