बोरिवली-पनवेल-मंगळूर असा पलायनाचा प्लॅन; शर्टवरील लोगोमुळे लोकल हत्येतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई लोकलमधील २२ वर्षीय मयंक लोहार हत्या प्रकरणात
रेल्वे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हत्येनंतर फरार झालेल्या रोशन सुवर्ण (वय
३०) याला अवघ्या १५ तासांत पनवेलमधून अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री
चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये झालेल्या वादानंतर त्याने मयंकवर चाकूने हल्ला
करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन सुवर्ण हा मिरा भाईंदर येथील
रहिवासी असून अंधेरी विमानतळ परिसरातील एका कार्गो हँडलिंग कंपनीत बारकोड तयार
करण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशी काम संपल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले
होते. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने कॅबऐवजी
लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. अंधेरी स्थानकावरून प्रथम श्रेणी डब्यात
चढल्यानंतर अंधेरी ते बोरिवलीदरम्यान दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून त्याचा मयंक
लोहार यांच्याशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रोशनने मयंकच्या पोटात चाकू
भोसकून गंभीर जखमी केले. लोकल बोरीवली स्थानकात पोहोचताच आरोपीने गर्दीचा फायदा
घेत पळ काढला.
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम
सुरू केली. चर्चगेट ते नालासोपारा मार्गावरील सुमारे ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे
फुटेज तपासण्यात आले. एका फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत होता. त्याने परिधान
केलेल्या शर्टावर संबंधित कंपनीचा लोगो दिसून आला. याच महत्त्वाच्या धाग्याच्या
आधारे पोलिसांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांची माहिती मिळवली. मोबाईल
क्रमांक, पत्ता आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. हत्येनंतर रोशन
प्रथम मिरा रोड येथील घरी गेला. तेथे कपडे बदलून आणि काही सामान घेऊन तो शहराबाहेर
पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने कुटुंबीयांना लवकर परत येईन असे सांगून पनवेल
गाठले होते.
तपासादरम्यान रोशनने मंगळूरला जाण्यासाठी बसचे तिकीटही बुक केल्याचे समोर आले. मात्र बस सुटण्यापूर्वीच पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून पनवेलमध्ये सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रोशनने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सध्या त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असून हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रमाचा तपशील तपासला जात आहे.