भर उन्हात घातलेल्या ‘हुडी’मुळे उघड झाला कट; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला अपघात म्हणून पाहिल्या गेलेल्या या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा मृत्यू पूर्वनियोजित हत्येचा भाग असल्याचा दावा केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती देताना सांगितले की, केतनच्या मृत्यूप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यावर संशय निर्माण झाला. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे कथित कटाचा उलगडा झाला.

तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे चेतन चौधरीचे सीसीटीव्ही फुटेज. पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन हा केतन आणि सिया लोहगडावर पोहोचण्यापूर्वीच तेथे आला होता. स्वतःची ओळख लपविण्यासाठी त्याने वूलनची ‘हुडी’ घातली होती आणि हेडफोन लावले होते. भर उन्हात हिवाळी कपडे घालून फिरणारी त्याची संशयास्पद हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांना चकवा देण्यासाठी चेतनने आपला मोबाईल फोन घरी ठेवला होता. मात्र, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तो दिसून आल्याने तपासाला निर्णायक दिशा मिळाली. या फुटेजमुळे त्याच्या उपस्थितीचा आणि कथित कटातील सहभागाचा संशय अधिक बळावला.

तपासादरम्यान सिया आणि चेतन यांच्यातील संपर्क, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावेही पोलिसांनी तपासले. यानंतर केतनच्या मृत्यूमागे प्रेमसंबंध आणि लग्नाबाबतची नाराजी हे संभाव्य कारण असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, केतन अग्रवाल हा परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय झाला होता. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या त्याच्या विवाहासाठी राजस्थानमधील जयपूर येथे भव्य सोहळ्याची तयारी सुरू होती. विवाहासाठी आलिशान पॅलेस आणि खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.