सोलापुरात भरदिवसा 27 तोळे सोन्याची चोरी; रोख 50 हजारांसह लाखोंचा ऐवज लंपास
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरातील वस्ती विहार
भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
निर्माण झाले आहे. मंगळवारी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात
चोरट्यांनी एका घरात प्रवेश करून सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार
रुपये रोख रक्कम चोरून नेली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार यांच्या घरी ही चोरी झाली. मंगळवारी
दुपारच्या सुमारास त्यांच्या सासऱ्यांचे त्यांच्या घरी आगमन झाले होते. त्यावेळी
घरातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
यानंतर अमर पवार हे देखील कामानिमित्त घराबाहेर पडले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते परत आले असता घराचे दार उघडे असल्याचे
त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील
कपाटे व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणीदरम्यान घरातून सुमारे २५ तोळे
सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर
कुटुंबीयांनी नातेवाईकांशी संपर्क साधून दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत का
याची खात्री केली. मात्र दागिने आणि रोकड सापडली नाही.
घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांना कळविण्यात
आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी, तपास पथक आणि तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट
देऊन पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची
तपासणी केली जात आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात
चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.