रिक्षाचालकाचा निर्घृण खून; मृतदेह रेल्वे रुळावर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरातील २४ वर्षीय रिक्षाचालकाचा किरकोळ वादातून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव रोहित मधुकर कोरे (वय २४) असे असून तो व्यवसायाने रिक्षाचालक होता. सोमवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, रोहितचा काही जणांसोबत दारूच्या नशेत किरकोळ वाद झाला होता. सोमवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास काही मित्र त्याला घरातून घेऊन गेले होते. त्यावेळी वाद होण्याची शक्यता असल्याचे रोहितने आपल्या आईला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला होता. मात्र नंतर मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाची ओळख रोहित कोरे अशी पटली. कुटुंबीयांनी या प्रकरणात खुनाचा संशय व्यक्त करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून मृत्यूमागील नेमके कारण, वादाचे स्वरूप आणि संशयितांची भूमिका याबाबत चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात असून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.