पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची नीलम नगर व सुमय्या नगरमध्ये पाहणी

आगामी पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाई आणि रुंदीकरणाच्या कामांना गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी नीलम नगर परिसरातील १२ नंबर नाला तसेच सुमय्या नगर येथील पावसाळी नाल्याची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नीलम नगर परिसरातील पाहणीदरम्यान नगरसेविका कलावती गदगे व कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान रचनेतील काही त्रुटी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर डॉ. ओम्बासे यांनी नाल्याचे नैसर्गिक वहनमार्ग तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सरळ करून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.

यावेळी जाधव यांच्या जमिनीशेजारील नाल्याचा काही भाग बंद करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. त्यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंजूर नकाशानुसार नाल्याची साफसफाई व रुंदीकरण करण्याचे आदेश दिले. तसेच कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासह आवश्यकतेनुसार पोलिस संरक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या. यानंतर आयुक्तांनी सुमय्या नगर येथील जैतुनबी शाळेजवळील बंदिस्त पावसाळी नाल्याची पाहणी केली. या ठिकाणी नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. शाळा प्रशासनाने नाल्याचा मार्ग बदलण्याची विनंती केली असली तरी सन २०११ च्या अधिकृत आराखड्यानुसार नाल्याचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी स्पष्ट केला.

नगर अभियंता सारिका आकुलवार यांनीही संबंधित जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आयुक्तांनी शाळा प्रशासनाला अतिक्रमण हटवून नाल्याच्या बांधकाम आणि साफसफाईसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळेसमोरील भागात बंदिस्त नाल्याची रचना करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणीदरम्यान नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक नगर अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव, नगरसेविका कलावती गदगे, कविता गज्जम, बसवराज केन्नाळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, "पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन आणि आवश्यक रुंदीकरणाची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही."