सोलापूरच्या माळशिरसमध्ये भीषण दुर्घटना; भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक भीषण
दुर्घटना घडली. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप
गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी
मृत्यू झाला. या दुर्घटनेत ६ जणांना स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांच्या मदतीने
सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणीगाव येथील १४ भाविक म्हसवड येथील
श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत गावाकडे जात असताना
तांदूळवाडी परिसरात त्यांच्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. रस्त्यालगत असलेल्या
विहिरीत वाहन कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. विहीर काठोकाठ पाण्याने भरलेली
असल्याने बचावकार्याला सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी
तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल
प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक माहितीनुसार,
मृतांमध्ये चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश असल्याचे
सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू
आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून विविध लोकप्रतिनिधींनी
घटनास्थळी भेट देण्यास सुरुवात केली आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी
दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तर आमदार
उत्तम जानकर यांनीही घटनास्थळी रवाना होत ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची
प्रतिक्रिया दिली. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटविण्याचे आणि पुढील मदतकार्याचे काम
सुरू आहे.