लोणी क्रॉसजवळ बस-टिपरची भीषण धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दहा जण जखमी
विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर (कँटर) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, टिपरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव टिपर समोरून येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात टिपर चालक अशोक उटगी, त्यांची पत्नी राधाबाई उटगी आणि सरकारी बस चालक हनुमंत चवलादी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्त टिपरचा नोंदणी क्रमांक KA-28-AA-6792 तर सरकारी बसचा नोंदणी क्रमांक KA-28-F-2468 असा आहे. अपघाताच्या वेळी टिपर चडचणकडे जात होता, तर सरकारी बस चडचणहून विजयपूरकडे येत होती. घटनेची माहिती मिळताच चडचणचे सीपीआय परशुराम मनगूळी, पीएसआय सोमेश गेज्जी तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. हा अपघात चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास पोलीस करत आहेत.