श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठ मंदिरासाठी १ कोटींच्या निधीची घोषणा; आमदार देवेंद्र कोठेंचा शब्द

सोलापूर शहरातील विष्णुपंत नगर, अक्कलकोट रोड येथील श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठ संस्थेमध्ये अधिक मासानिमित्त आयोजित धर्मसभा व सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित राहून आमदार देवेंद्र कोठे यांनी मंदिराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या आज्ञेवरून श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठ मंदिराच्या सभा मंडपासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार कोठे यांनी जाहीर केले. कार्यक्रमात श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत इष्टलिंग पूजा, जगद्गुरू उत्सव, धर्मसभा आणि सांगता समारंभ पार पडला. यावेळी रंभापुरी पीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. विरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच काशी पीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील विकासकामांबाबतही माहिती दिली. विष्णुपंत नगरातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मल्लिकार्जुन नगर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून भविष्यातही परिसरातील रस्ते व मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमास नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. शैलेश पाटील, नगरसेवक अजय पोन्नम, मीनाक्षी कडगंची, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगांवकर, प्रकाश वाले, मल्लिनाथ मसरे, अप्पू कडगंची यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.