मनपा शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेशांचे वितरण
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात
आलेला “शाळा प्रवेशोत्सव २०२६” कार्यक्रम शहरातील विविध मनपा शाळांमध्ये
उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी
विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या
उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी मनपा मराठी मुले शाळा क्रमांक २८ येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने उपस्थित होते. तुळजापूर वेस येथील महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक २ येथे स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी उपस्थिती लावली. तर महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ येथे सभागृह नेते नरेंद्रजी काळे, नगरसेविका अश्विनी चव्हाण आणि वनिता पाटील उपस्थित होत्या. यावेळी सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
शहरातील विविध मनपा शाळांमध्ये नगरसेवक, नगरसेविका आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग नोंदविला. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त पवीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित आणि सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर, सुरेश कासार, संतोष बुलबुले, रजनी राऊळ, निलोफर शेख तसेच केंद्रीय मुख्याध्यापकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रवेशोत्सवावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काही शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विशेष बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. मनपा शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि विविध शैक्षणिक सुविधांची माहिती पालकांना देण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, "शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक बालक शाळेत दाखल होऊन नियमित शिक्षण घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालकांनी मनपा शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना नियमित शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा सक्षम नागरिक आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे."