पुण्यात धक्कादायक प्रकार; आध्यात्मिक गुरूच्या नावाखाली १७ वर्षे लैंगिक शोषण, ८ जण अटकेत
पुण्यातील खराडी परिसरात स्वतःला आध्यात्मिक गुरू आणि ईश्वराचा अवतार
म्हणून सादर करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. एका
उच्चशिक्षित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तब्बल १७ वर्षे तिच्यावर लैंगिक, मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी कंपनीत कार्यरत
असून तिचे कुटुंब मूळचे हरियाणातील आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी कुटुंबाची ओळख
कथित आध्यात्मिक गुरू राधामोहन मिश्रा याच्याशी झाली होती. कालांतराने संपूर्ण
कुटुंब त्याच्या प्रभावाखाली आले. सन २०१० नंतर कुटुंब पुण्यात स्थायिक झाल्यानंतर
पीडित महिला आश्रमाच्या संपर्कात राहू लागली. याच काळात तिच्यावर मानसिक दबाव,
शारीरिक छळ आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने महिलेला अपमानास्पद आणि अमानुष वागणूक
दिली तसेच विविध प्रकारच्या छळाला सामोरे जाण्यास भाग पाडले.
महिलेने अनेक वेळा आपल्या पालकांना याबाबत माहिती दिल्याचा दावा केला
असला तरी तिच्यावर विश्वास ठेवण्यात आला नाही. पुढे आरोपीने तिच्या वैयक्तिक आणि
वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अखेर पीडितेने काही
पुरावे गोळा करून कुटुंबीयांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल
करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा याच्यासह एकूण आठ
जणांविरुद्ध बलात्कार, गुन्हेगारी कट, मानसिक व
शारीरिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व
अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
केला. तपासादरम्यान आरोपीने इतर महिलांनाही लक्ष्य केले असण्याची शक्यता पोलिसांनी
व्यक्त केली आहे. तसेच पीडितेचे कथित आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आले होते का
आणि त्याचा गैरवापर झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपी पक्षाच्या वकिलांनी या प्रकरणामागे मालमत्ता
वाद असल्याचा दावा करत अटकेला विरोध दर्शविला आहे. मात्र न्यायालयाने दोन्ही
बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.