सोलापूर महापालिकेची डिजिटल झेप; TDR प्रमाणपत्रांचे प्रथमच ऑनलाइन वितरण
सोलापूर महानगरपालिकेने पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने
महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) मंजुरी
व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. BPMS (Building
Permission Management System) पोर्टलच्या माध्यमातून शहराच्या
इतिहासात प्रथमच TDR प्रमाणपत्रांचे ऑनलाइन वितरण करण्यात
आले. सोलापूर शहर विकास आराखड्यानुसार (DP) विविध रस्ते
विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या खाजगी मिळकतधारकांना महाराष्ट्र शासनाच्या
एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) अंतर्गत
हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) प्रदान केले जातात. यापूर्वी
ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी नागरिकांना
अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी TDR प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्याचे निर्देश नगर रचना विभागाला दिले होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या
अंतर्गत मिळकतधारक श्री. मल्लिकार्जून शिवशरण शेगावकर आणि श्री. विश्वनाथ शेगावकर
यांना १८ जून २०२६ रोजी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते BPMS पोर्टलद्वारे TDR प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदर
प्रकरणात मौजे मजरेवाडी येथील सर्व्हे क्रमांक 9/9, 9/7+8 मधील
जागा विकास आराखड्यातील 9 मीटर, 12 मीटर,
18 मीटर आणि 30 मीटर रुंदीच्या DP रस्त्यांसाठी बाधित होत असल्याने संबंधित मिळकतधारकांना नियमानुसार TDR
मंजूर करण्यात आला.
ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी उपसंचालक श्री. झगडे, सहाय्यक
संचालक श्री. शितोळे, कार्यकारी अभियंता श्री. मठपती यांचे
मार्गदर्शन लाभले. तसेच कनिष्ठ अभियंता श्री. सलमान मनियार आणि श्री. रोहित हारके
यांनी तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून हे पहिले ऑनलाइन TDR प्रकरण निकाली काढले. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले की,
“महानगरपालिकेच्या सेवा अधिक पारदर्शक, वेगवान
आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. TDR
प्रक्रियेचे ऑनलाइनकरण हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल
आहे. यामुळे मिळकतधारकांच्या कार्यालयीन फेऱ्या कमी होतील, प्रक्रियेला
गती मिळेल आणि संपूर्ण कार्यवाही अधिक पारदर्शक होईल.” तसेच भविष्यात
महानगरपालिकेच्या विविध सेवांचे अधिकाधिक डिजिटायझेशन करून नागरिकांना आधुनिक,
सुलभ आणि विश्वासार्ह सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.