लोकलच्या दरवाजावरून वाद अन् तरुणाची हत्या; २२ वर्षीय मयांकचा प्रवास ठरला शेवटचा
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-नालासोपारा
जलद लोकलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे. दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात २२ वर्षीय मयांक
लोहार यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या
माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे
लोकलमध्ये मोठी गर्दी होती. मयांक लोहार हे प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत
होते. अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून त्यांचा
एका सहप्रवाशाशी वाद झाला.
वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात मयांक
यांच्या पोटात चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत असतानाच लोकल
रात्री ११.०४ वाजता बोरीवली स्थानकावर पोहोचली. याच संधीचा फायदा घेत आरोपी
प्लॅटफॉर्मवर उतरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा
दलाचे कर्मचारी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जखमी मयांक यांना तातडीने
स्ट्रेचरच्या सहाय्याने बाहेर काढून बोरीवली स्थानकावरील वैद्यकीय कक्षात नेण्यात
आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी कांदिवली येथील शताब्दी
रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पश्चिम
रेल्वे प्रशासनाने घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू केले. वरिष्ठ रेल्वे अधिकारी
आणि सुरक्षा यंत्रणांनी बोरीवली स्थानकाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, स्थानक आणि लोकलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे
काम सुरू आहे. प्रवाशांचे जबाब नोंदविण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष
पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
घटनाक्रम एका नजरेत :
- रात्री १०.०५ :
चर्चगेटहून लोकल रवाना
- रात्री १०.४२ :
मयांक लोहार अंधेरी स्थानकावर प्रथम श्रेणी डब्यात चढले
- अंधेरी–बोरीवली
दरम्यान दरवाजा बंद करण्यावरून वाद
- वादानंतर आरोपीने
चाकूने हल्ला केल्याचा आरोप
- रात्री ११.०४ :
बोरीवली स्थानकावर लोकल पोहोचताच आरोपी फरार
- रात्री ११.०७ :
रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल
- जखमी मयांक यांना
रुग्णालयात हलविण्यात आले