मराठी उच्चारांवरील वादानंतर राहुल नार्वेकरांची दिलगिरी; ‘अस्पष्ट प्रिंट आणि तांत्रिक चुकांमुळे घडली चूक’

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना केलेल्या मराठी वाचनातील चुकांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणातील अनेक शब्दांच्या चुकीच्या उच्चारांमुळे आणि काही नावांच्या चुकीच्या उल्लेखांमुळे सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सभागृहात एकूण बारा शोकप्रस्ताव होते आणि त्यासाठी मिळालेली प्रिंट अस्पष्ट होती. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने वाचन करताना चुका झाल्या.

नार्वेकर म्हणाले की, “आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. जे घडले ते अनावधानाने झाले असून त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. माझ्या चुकीमुळे राज्यातील नागरिक, सभागृहातील सदस्य किंवा आशाताईंचे चाहते दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या चार वर्षांत विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक भाषणे आणि शोकप्रस्ताव मराठीत मांडले आहेत. मराठी भाषेबद्दल त्यांना अभिमान असून आशा भोसले यांच्या कार्याबद्दलही त्यांना अत्यंत आदर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांसह विविध स्तरांतून टीका झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नार्वेकर यांच्या वाचनशैलीवर टीका करत मराठी भाषेचा अवमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत नार्वेकर यांच्या भाषणातील अनेक चुकांकडे लक्ष वेधले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, श्रद्धांजली प्रस्तावाचे वाचन करताना नार्वेकर यांनी अनेक शब्द आणि व्यक्तींची नावे चुकीची उच्चारली. विशेषतः दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख चुकीच्या नावाने झाल्याने यावरून अधिक वाद निर्माण झाला.