पीएम ई-बस सेवेला गती; सोलापुरात १०० इलेक्ट्रिक बस लवकरच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ अंतिम टप्प्यात

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोलापूर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत शहरासाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे सुरू असलेले काम, चार्जिंग सुविधा आणि बस पुरवठादार कंपनीसोबत होणाऱ्या कराराचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून त्यामध्ये ९ मीटरच्या ७० बसेस आणि १२ मीटरच्या ३० बसेस समाविष्ट आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पीएमईसी बैठकीत या बसांना मंजुरी देण्यात आली आहे. टी.पी. क्रमांक २, बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागरी बांधकामाची सुमारे ८० टक्के, तर 'बिहाइंड द मीटर' (BTM) वीज पायाभूत सुविधांची ९५ टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे जुलै २०२६ अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बैठकीत वाहनतळासाठी आवश्यक ३३ केव्ही वीजवाहिनी, ५००० केव्हीए क्षमतेची वीज व्यवस्था, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया यांसारख्या सुविधांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. उपकेंद्र आणि केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली असून जेबीएम (JBM) प्रा. लि., नवी दिल्ली या कंपनीसोबत करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

ई-बस संचालन, देखभाल-दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि इतर संचालनात्मक जबाबदाऱ्या जेबीएम कंपनीकडे राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. लोकप्रतिनिधींनी शहर व ग्रामीण भागात अधिक बससेवा उपलब्ध करून देणे, बसथांब्यांवर वेळापत्रक प्रदर्शित करणे, विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करणे, तीर्थक्षेत्रांसाठी नवीन मार्ग सुरू करणे तसेच ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना मांडल्या.

महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देत १५ ऑगस्टपर्यंत किमान १५ ते ३० इलेक्ट्रिक बसेस सेवेत दाखल करण्यासाठी आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देश दिले. बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तळवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेवक मनिष केत, तसेच जेबीएम कंपनीचे प्रतिनिधी कुलदीप गंगुरडे आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सोलापूरला केंद्र शासनाकडून १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर.
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात.
👉 जुलैअखेर वाहनतळाचे उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा.
👉 १५ ऑगस्टपर्यंत १५ ते ३० ई-बस रस्त्यावर आणण्याचे निर्देश.
👉 ई-बस सेवेमुळे सोलापूरमध्ये आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि नागरिकाभिमुख सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार.