नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज निकाल; आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप?

महाराष्ट्र दिनी (१ मे) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने २५ जून रोजी दोषी ठरविले होते. आज (२९ जून) विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप याबाबत अंतिम शिक्षा सुनावली जाणार आहे. राज्यभरात संताप निर्माण झालेल्या या प्रकरणाचा अवघ्या दोन महिन्यांत निकाल लागणार असल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वाच्या निर्णयांचा संदर्भ देत युक्तिवाद सादर केला. मूळ फिर्यादींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. मयूर दोडके यांनी बाजू मांडली, तर बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला.

या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी जलदगतीने पूर्ण केला. अवघ्या १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विशेष न्यायालयात २१ मेपासून दैनंदिन सुनावणी सुरू झाली होती. संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन या खटल्याची सुनावणी बंद दाराआड घेण्यात आली. सरकार पक्षाने पीडित मुलीचे आई-वडील, आजी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषक यांच्यासह एकूण ५५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.