नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी; अवघ्या ५८ दिवसांत चिमुकलीला न्याय

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सुनावणी अवघ्या ५८ दिवसांत पूर्ण होत निकाल लागल्याने ही राज्यातील जलदगती न्यायप्रक्रियेतील महत्त्वाची घटना ठरली आहे.

विशेष न्यायालयाने यापूर्वी आरोपीला दोषी ठरविले होते. शिक्षा सुनावताना न्यायालयाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे ठोस असून तपास यंत्रणांनी सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी यशस्वीरीत्या सिद्ध केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

न्यायालयाने म्हटले की, आरोपीचा पूर्वइतिहास गंभीर असून स्वतःची वासना शमविण्यासाठी त्याने हे अमानुष कृत्य केले. वयाव्यतिरिक्त शिक्षा कमी करण्यासारखे कोणतेही कारण नसल्याने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

राज्यभर संतापाची लाट

१ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून आरोपीला अटक केली आणि अवघ्या १५ दिवसांत सुमारे १,२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष

विशेष न्यायालयाने २१ मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने पीडितेचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ, डीएनए विश्लेषक यांच्यासह ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज शिक्षा जाहीर केली.

विविध गंभीर कलमांखाली दोष सिद्ध

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील अपहरण, बलात्कार, खून, विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले.