२०० सीसीटीव्हींची तपासणी; पुण्यातून आंतरराज्यीय घरफोडी टोळीतील चोरटे जेरबंद, १०.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीतील २७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने पुणे नाका परिसरातील कल्याणनगर येथे बंद घर फोडून सुमारे २७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सव्वा लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि शहरातील विविध भागांतील तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी सूरजितसिंग राजपालसिंग राठोड (वय ३४, रा. हडपसर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर त्याचा साथीदार मंजित कुमार (रा. उत्तर प्रदेश) यालाही अटक करण्यात आली. पोलिस तपासात चोरीचे दागिने विकत घेणारे अब्दुल रशीद अब्दुल कादर शेख (रा. पुणे, मूळ पश्चिम बंगाल) याचाही सहभाग उघड झाला. आरोपींकडून चोरीतील २७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने केली.