मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सखल भाग जलमय, IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अंधेरी, मालाड, जोगेश्वरी, कुर्ला, मुलुंड आणि कांजूरमार्ग परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, अंधेरी भुयारी मार्गात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बुधवारी सकाळी सुमारे ८ वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग दरवर्षी पावसाळ्यात जलमय होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १ जुलै रोजी मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्येही पुढील काही दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.