सोलापूरच्या विकासकामांना गती; उड्डाणपूल, पाणीपुरवठा, विमानसेवा व झोपडपट्टी पुनर्विकासासह अनेक प्रश्न मार्गी
सोलापूर शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रलंबित
प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे
यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, विमानसेवा आणि महापालिकेतील विविध
प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत सोलापूर उड्डाणपूल, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, विमानसेवा सुरू
करण्याबाबतचे प्रयत्न, झोपडपट्टी पूर्णविकास योजना,
महापालिकेतील २४९ रोजंदारी कामगारांचे प्रश्न तसेच १५ वाहनचालकांच्या सेवेशी संबंधित विषय मार्गी लागल्याचे
सांगण्यात आले.
या बैठकीमुळे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी शासनाकडून सातत्याने सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.