दमानी नगरमध्ये जेसीबीने पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी फोडली; चार तासांत हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया
सोलापूर:- सोलापूर शहरात आधीच पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दमानी नगर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी वाया गेले. रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे सहा वाजता रस्ता खोदण्याचे काम सुरू असताना जलवाहिनीला धक्का बसला. त्यानंतर जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. सकाळी सहा ते दहा या चार तासांच्या कालावधीत हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. घटना घडून चार तास उलटल्यानंतरही महापालिकेचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अखेर सकाळी सुमारे अकराच्या सुमारास पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जलवाहिनीचा पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले.
दमानी नगरसह परिसरातील अनेक भागांमध्ये आधीच आठवड्यातून एकदाच किंवा पाच ते सात दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला पाण्यासाठी दिवसन्दिवस प्रतीक्षा करावी लागते, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिकांनी रस्त्याच्या कामांपूर्वी जलवाहिन्यांचे नकाशे तपासले जात नसल्याचा आरोप केला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे, अशी मागणी केली आहे.