साताऱ्यात पावसाचं थैमान; कोयना धरणात पाण्याची झपाट्याने आवक, अतिवृष्टीचा इशारा, लिंगमळा धबधबा मार्ग बंद
सातारा जिल्ह्यासह पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर परिसरात गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये ४७३ मिमी, कोयनानगरमध्ये २५७ मिमी आणि नवजा येथे २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात सध्या सुमारे ७५ ते ७८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत असून अवघ्या २४ तासांत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात ६.७६ टीएमसीची वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १७.८० टीएमसी होता. तो सोमवारी सकाळपर्यंत वाढून २२.५४ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सततच्या पावसामुळे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळा
धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून पर्यटकांना तेथे जाण्यास मनाई
करण्यात आली आहे. तसेच वेण्णा तलाव तुडुंब भरला असून कोयना आणि कृष्णा नदीच्या
पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम
भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर महाबळेश्वर, पाटण, जावली,
वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने
नागरिकांना नदी, ओढे आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे
टाळण्याचे तसेच आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.