मुसळधार पाऊस आहे,; शासनाचे अलर्ट पाहा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
राज्यात ठाणे, रायगड, पालघर,
पुणे, नाशिक आणि इतर अनेक भागांत अतिमुसळधार
पावसाचा इशारा कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क
राहण्याचे आवाहन केले आहे. शक्य असल्यास शासनाचे हवामान अलर्ट पाहूनच घराबाहेर
पडावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ६ जुलैपर्यंत अनेक भागांत मुसळधार
ते अतिमुसळधार पावसासह वादळी वारे आणि सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची शक्यता
हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यभरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा
सतर्क असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन
परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू
असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक
ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा
सल्ला देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, संबंधित भागातील नागरिकांना एसएमएसद्वारे सतत सूचना पाठवल्या जात आहेत.
अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून परिस्थितीनुसार पुढील
निर्णय घेतले जात आहेत. यावेळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने
बांधलेल्या कनेक्टिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
संपूर्ण रस्त्यावर खड्डे नसून केवळ कनेक्टिंग पॉइंटवर दोन ठिकाणी समस्या निर्माण
झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन रस्त्यांवर पहिल्या पावसानंतर तपासणी करून
आवश्यक दुरुस्ती केली जाते, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या
टीकेलाही उत्तर दिले. मुख्यमंत्री यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन
करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.