मुख्यमंत्री फडणवीसांना राज ठाकरेंचे खुले पत्र; 'मौन सोडा, बेफाम नेत्यांवर कठोर कारवाई करा'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून खुले पत्र लिहित राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि सत्ताधारी नेत्यांच्या वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली आहे. सत्तेचा गैरवापर, असंवेदनशील वक्तव्ये आणि चुकीच्या कृत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्रातील सत्ताधाऱ्यांबाबत जशी सत्तेच्या अहंकाराची भावना निर्माण झाली होती, त्याच प्रकारचे चित्र आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेवर याचा विपरीत परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पत्रात एका आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्याचा थेट उल्लेख टाळत, लोकांच्या मृत्यूवर हसल्याचा आरोप करत अशा प्रकारच्या वर्तनावर सरकारने कठोर भूमिका घेतली नसल्याची टीका करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा संवेदनशील आणि सुसंस्कृत नेत्याची असल्याचे सांगताना, अशा घटनांवर त्यांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये होत असतानाही शिस्तभंगाची कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

आपल्या ३७ वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी सांगितले की, पूर्वी राजकीय नेत्यांकडून चूक झाल्यास पक्षीय पाठबळ न देता ती मान्य केली जात असे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील राजकीय शिस्तीचे उदाहरण देत आज मात्र "आपला माणूस" म्हणून चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढल्याची टीका त्यांनी केली. पत्राच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन करत त्यांनी असंवेदनशील आणि बेफाम वर्तन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी केली. तसेच, "फडणवीस चुकीचे वर्तन सहन करत नाहीत" हा स्पष्ट संदेश गेल्यास राज्यातील राजकीय व्यवस्थेत शिस्त निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.