E20 पेट्रोलवरून नितीन गडकरींचा मोठा खुलासा; "एक तरी गाडी बिघडल्याचं दाखवा, नाव सांगा!"

देशभरात E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. E20 पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होत असल्याचा दावा करणाऱ्यांनी अशा एकाही वाहनाचे नाव आणि पुरावा सादर करावा, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. गडकरी म्हणाले की, देशात आतापर्यंत E20 पेट्रोलमुळे कोणत्याही कार किंवा दुचाकीचे इंजिन निकामी झाल्याची अधिकृत नोंद नाही. सोशल मीडियावर पसरवली जाणारी चुकीची माहिती ही जाणीवपूर्वक चालवली जाणारी 'पेड' मोहीम असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारत दरवर्षी सुमारे २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि पर्यायी हरित इंधनाला प्रोत्साहन देणे हा सरकारचा उद्देश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

इथेनॉल मिश्रणामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मक्याला पूर्वी सुमारे १,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता, तो इथेनॉल उद्योगामुळे २,८०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. इथेनॉल उद्योगातून त्यांच्या कुटुंबाला फायदा होत असल्याच्या आरोपांवरही गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने असले तरी E20 धोरण हे कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून देशहित, ऊर्जा स्वावलंबन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सरकार भविष्यात E85, E100, B100 बायोडिझेल तसेच हायड्रोजन-सीएनजीसारख्या पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.