'ही माणसं नाहीत, आम्हाला जनावरांसारखं मारलं'; KDMC रुग्णालयात डॉक्टर-नर्सला मारहाण, शिंदेसेनेच्या नगरसेवकासह चौघांवर गुन्हा

डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारावरून वाद झाल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या चार समर्थकांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या नवजात बाळाला एनआयसीयू उपचारांची आवश्यकता भासू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड्स भरलेले असल्याने डॉक्टरांनी रुग्णाला दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. या निर्णयावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्षेप घेत नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलावले. काही वेळातच ते समर्थकांसह रुग्णालयात पोहोचले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना बाजूला ठेवत थेट डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. विशाल साळुंखे यांना मारहाण करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला डॉक्टरांचा मोबाईल हिसकावून तोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मध्यस्थी करणाऱ्या दोन परिचारिकांनाही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पीडित परिचारिकांनी भावनिक प्रतिक्रिया देताना, "ही माणसं नाहीत, आम्हाला जनावरांसारखं मारलं," असे सांगत आपली व्यथा मांडली.

या घटनेनंतर KDMC प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या चार समर्थकांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.