मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे चार धक्के; हिंगोली, नांदेड आणि परभणीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मराठवाड्यात एकीकडे मुसळधार पावसाची परिस्थिती असताना
दुसरीकडे मध्यरात्री सलग चार भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे
वातावरण निर्माण झाले. हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये
रात्री १.३७ ते पहाटे ३.२३ या कालावधीत भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्हा आपत्कालीन
नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, पहिला धक्का रात्री १.३७
वाजता बसला. त्यानंतर २.१५, २.१७ आणि ३.२३ वाजता आणखी तीन
सौम्य धक्क्यांची नोंद झाली. या भूकंपांची तीव्रता अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९ आणि ४.१ रिश्टर स्केल इतकी होती.
भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गाव परिसरात होता. काही धक्क्यांचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे आणि काकरढाबा गावाजवळ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सर्व धक्क्यांची खोली सुमारे १० किलोमीटर नोंदवण्यात आली. रात्रीच्या वेळी बहुतांश नागरिक झोपेत असताना अचानक धक्के जाणवल्याने अनेकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. गेल्या सहा वर्षांत हिंगोली जिल्ह्यात औंधा नागनाथ, कलमनुरी आणि वसमत तालुक्यात ३७ हून अधिक सौम्य भूकंपांची नोंद झाली आहे. मात्र, एकाच रात्रीत सलग चार भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातही गूढ आवाज आणि सौम्य हादरे जाणवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण कायम आहे.