सिद्धेश्वर पंचकट्ट्यावरील ब्रिटिशकालीन कंदील धोकादायक; दुर्घटनेपूर्वी महापालिकेने दुरुस्ती करण्याची मागणी
सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर पंचकट्टा येथे असलेला
ब्रिटिशकालीन ऐतिहासिक कंदील सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पंधरा
दिवसांपूर्वी एका वाहनाच्या धडकेने या कंदिलाचा काही भाग कोसळला असून, उर्वरित
भागही कमकुवत झाल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात
आहे. हा कंदील सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाचा एक भाग असून, ब्रिटिश
काळापासून तो पंचकट्टा परिसरात उभा आहे. मात्र, देखभाल आणि
दुरुस्तीअभावी त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांनी कंदिलाच्या धोकादायक स्थितीबाबत महापालिका
प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिल्याचे सांगितले. मात्र, अद्याप
याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सिद्धेश्वर
पंचकट्टा हा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी,
नागरिक, व्यापारी तसेच सिद्धेश्वर मंदिराकडे
जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत धोकादायक कंदील कोसळल्यास
गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार
घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने तातडीने या ब्रिटिशकालीन कंदिलाची पाहणी करावी.
त्याची आवश्यक दुरुस्ती करून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच नागरिकांच्या
सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी
नागरिकांकडून होत आहे.