घंटागाडी कामगारांचे अन्नत्याग आंदोलन; किमान वेतन, हक्कांसाठी न्यायाची मागणी
सोलापूर : किमान वेतन, कामगारांचे हक्क आणि विविध मागण्यांसाठी सोलापुरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील घंटागाडी कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कामगारांवर मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. कामगारांच्या मागण्यांसाठी २० ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याचे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. मात्र, अद्याप न्याय मिळाला नसल्याने ५ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत ‘अन्नत्याग (आमरण)’ आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना आयोगाकडे देण्यात आली होती. या प्रकरणी विशाल हणमंत नागटिळक व इतर अर्जदारांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन ई-मेलद्वारे आयोगाकडे सादर केले होते. या निवेदनात अनुसूचित जातीच्या घंटागाडी कामगारांना वेठबिगारीप्रमाणे काम करून घेतले जात असल्याचा तसेच कामगार हक्कांची मागणी केल्याने कामावरून कमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या निवेदनाची दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे. आयोगाचे सदस्य सचिव समाधान पवार यांनी संबंधित निवेदन पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कार्यालयाकडे वर्ग केले असून, अर्जदारांना त्यांच्या स्तरावरून परस्पर कळविण्याची विनंती संबंधित यंत्रणांना केली आहे. आयोगाच्या पत्राच्या प्रती सोलापूरचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, कामगार आयुक्त तसेच सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. घंटागाडी कामगारांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आंदोलनाची दखल घ्यावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
आंदोलनकर्ते : नागराज पंडित चिमणे, राजकुमार पंडित चिमणे,विशाल
हणमंत नागटिळक व इतर अर्जदार