पत्रकारांच्या गृहप्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर : शहरात पत्रकारांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाला महापौर विनायक कोंड्याल यांनी भेट देऊन पाहणी केली. पत्रकारांच्या अनेक वर्षांच्या घराच्या स्वप्नाची पूर्तता या प्रकल्पामुळे होत असून, या गृहप्रकल्पासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर कोंड्याल यांनी दिली. विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवनालगत उभारण्यात येत असलेल्या पत्रकारांच्या गृहप्रकल्पाची महापौर विनायक कोंड्याल यांनी आज दुपारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध इमारती तसेच उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. यावेळी महापालिकेचे उपअभियंता रौफ सरकाजी, उपअभियंता इदायत मुजावर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष उमेश कदम यांच्यासह रामेश्वर विभुते, बाळकृष्ण दोड्डी, विकास कस्तुरे, विक्रांत कालेकर, संगमेश जेऊरे, आमसिद्ध व्हनकोरे, अमोल कांबळे, योगेश कल्याणकर, कादर शेख, राजू बंडगर, महादेव मादगुंडी, भास्कर अल्ली आदी पत्रकार उपस्थित होते.  याप्रसंगी दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे आणि पत्रकार विनोद कामतकर यांच्या हस्ते महापौर विनायक कोंड्याल तसेच उपस्थित अधिकाऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

महापौर कोंड्याल म्हणाले की, पत्रकारांच्या गृहप्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पत्रकारांना आवश्यक त्या सुख-सुविधा मिळाव्यात, या दृष्टिकोनातून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. पत्रकारांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून म्हाडाअंतर्गत हा गृहप्रकल्प साकारला जात असल्याचे सांगत महापौर कोंड्याल यांनी पत्रकारांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे नमूद केले. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आपल्या मायभूमी सोलापुरातच हक्काचे आणि स्वतःचे घर मिळत असल्याचा आनंद पत्रकारांना या प्रकल्पामुळे मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या गृहप्रकल्पासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची महापालिकेची भूमिका राहील, अशी ग्वाही यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.