चारित्र्यावर संशय, फ्लॅट नावावर करण्यासाठी दबाव; पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

नाशिक : पतीकडून मानसिक छळ, चारित्र्यावर संशय आणि फ्लॅट सासरच्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारीनंतर नाशिकमध्ये एका ३७ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपाली अनिल पवार असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचे पती अनिल पवार यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली पवार या नाशिकमधील महात्मा नगर परिसरात राहत होत्या. त्यांचा विवाह अनिल पवार यांच्याशी २०१४ मध्ये झाला होता. दीपाली या जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचे पती अनिल पवार हे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीपाली यांचा गेल्या काही दिवसांपासून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी अहिल्यानगर येथे घेतलेला फ्लॅट सासरच्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. याशिवाय त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कथित त्रासाला कंटाळून दीपाली यांनी ५ ऑक्टोबर रोजी अल्फोस पेस्टिसाइड नावाचे विषारी औषध प्राशन केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना चक्कर आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी स्वतः कार चालवत गंगापूर रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर दीपाली यांचे भाऊ भूषण गायकवाड यांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत दीपाली यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल पवार यांच्याविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.