परभणीत ऊसतोडीदरम्यान भीषण अपघात; रस्त्याकडेला झोपलेल्या दोन सख्ख्या भावांना जेसीबीने चिरडले, जागीच मृत्यू

परभणी : ऊसतोडीच्या कामादरम्यान थकून रस्त्याकडेला विश्रांतीसाठी झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा जेसीबी यंत्राखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. परभणी तालुक्यातील पोरवड येथे शनिवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. परमेश्वर अशोक गीराम (वय ३५) आणि नवनाथ अशोक गीराम (वय ३३, रा. पोरवड, ता. परभणी) अशी मृत भावांची नावे आहेत.

जेसीबी मागे घेताना घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ स्वतःच्या शेतात दिवसभर ऊसतोडीचे काम करत होते. रात्रीही यंत्रांच्या साहाय्याने ऊसतोड सुरू होती. सततच्या कामामुळे प्रचंड थकवा आल्याने दोघांनी माळसोना रोडलगत रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी झोप घेतली होती. दरम्यान, तोडलेला ऊस जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते. उसाच्या फडातून ऊस घेऊन आलेले जेसीबी यंत्र ट्रॉलीमध्ये ऊस टाकण्यासाठी मागे घेतले जात होते. यावेळी अंधारात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन्ही भावांकडे चालकाचे लक्ष गेले नाही. त्यामुळे जेसीबीखाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

गीराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दिवसभर शेतात कष्ट करून रात्रीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या दोन भावांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने पोरवड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने गीराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैठणा पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत आणि पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसतोड यंत्रांच्या साहाय्याने केली जात आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कामादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.