प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पतीची हत्या; पत्नी आणि प्रियकराला अटक, धाराशिवमधील घटना

धाराशिव : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे. गोलेगाव येथील २७ वर्षीय गोविंद कागदे यांचा कुंतलगिरी डोंगरातील वाकड तलावाजवळील रामकुंड शिवारात खून करण्यात आला. या प्रकरणी गोविंद यांची पत्नी अंजली चौधरी आणि तिचा प्रियकर शुभम खोसे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आठ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद कागदे यांचे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अंजली चौधरी हिच्याशी लग्न झाले होते. गोविंद यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. ते कुटुंबातील एकुलते एक मुलगे होते.अंजलीचे शुभम खोसे याच्याशी पूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. अंजलीची बहीण शुभमच्या मोठ्या भावाशी विवाहबद्ध झाल्याने दोघांची ओळख झाली आणि त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची माहिती आहे. मात्र, अंजलीच्या वडिलांनी शुभमसोबतच्या लग्नाला विरोध केला. त्यानंतर अंजलीचा विवाह गोविंद यांच्याशी झाला. मात्र, तिचे शुभमशी असलेले संबंध कायम असल्याचा आरोप आहे.

रामकुंड शिवारात नेऊन हत्या केल्याचा आरोप

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अंजली आणि शुभम यांनी काहीतरी निमित्त काढून गोविंद यांना रामकुंड शिवारात नेले. तेथे दारू किंवा शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून त्यांना दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर गोविंद यांचा गळा चिरून आणि डोक्यावर दगडाने वार करून खून केल्याचे वृत्त आहे.

गुरे चारणाऱ्या व्यक्तीमुळे प्रकार उघडकीस

घटनेच्या वेळी परिसरात गुरे चारणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला. त्याने तातडीने वाशी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि अंजली चौधरी व शुभम खोसे या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शिंदे करीत आहेत. या गुन्ह्यात आरोपींना आणखी कोणाची मदत झाली होती का, तसेच हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.